August 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथे ब्रह्माकुमारीज सेंटर, पिरंगुट यांच्या वतीने इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्ती अभियान व प्रतिज्ञा’ आणि ‘ध्यानधारणा’ या विषयांवर जनजागृतीपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांनी नागपंचमीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा अत्यंत समर्पक संदेश दिला. “साप आपल्याला चावू नये म्हणून आपण त्याच्यापासून अंतर ठेवतो आणि काळजी घेतो. त्याचप्रमाणे अमली पदार्थ किंवा कोणतेही व्यसन आपल्या जीवनात प्रवेश करू नये, यासाठी केवळ स्वतः व्यसनांपासून दूर राहणे पुरेसे नाही, तर आपल्या आजूबाजूला असे पदार्थ किंवा त्यांचा प्रभाव येणार नाही, चुकीची संगत निर्माण होणार नाही आणि आपण त्याच्या संपर्कात येणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे,” असा मोलाचा संदेश त्यांनी आज नागपंचमीचे औचित्य साधून सर्वांना देऊन व्यसनाची सुरुवात अनेकदा छोटी वाटते; मात्र त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. त्यामुळे ‘एकदा करून पाहू’ या विचारालाही आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. स्वतःचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि भविष्यातील ध्येय यांना प्राधान्य देत व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमासाठी ब्रह्माकुमारीज सेंटरच्या ज्योती दीदी, मीनाक्षी दीदी, गीता दीदी आणि श्री. विनोद नकाते आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ आणि विविध व्यसनांचे शरीर, मन, शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना चांगली संगत, सकारात्मक विचार, योग्य सवयी, आत्मसंयम, नियमित व्यायाम, वाचन, खेळ आणि जीवनातील निश्चित ध्येय यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये ‘नाही’ म्हणण्याची ताकद निर्माण करावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच ध्यानधारणेमुळे एकाग्रता वाढण्यास, मन शांत ठेवण्यास, सकारात्मक विचार करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ध्यानधारणेचे महत्त्व समजावून देत सकारात्मक आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणींनाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

यावेळी मुख्य प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ब्रह्माकुमारीज सेंटरच्या ज्योती दीदी यांनी पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल हे ‘शिक्षणाचे सुंदर केंद्र’ असल्याचे गौरवोद्गार काढत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्रमुख प्राचार्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित, पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. सना इनामदार, पूर्व-प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे आणि माध्यमिक विभागाच्या प्रमुख सौ. रुपाली गर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

‘व्यसनमुक्त युवा – निरोगी समाज’ या संदेशाची प्रभावी जनजागृती करणारे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. नागपंचमीच्या औचित्याने दिलेला ‘जसे विषारी सापापासून सावध राहतो, तसेच व्यसनांच्या विषापासूनही स्वतःला आणि आपल्या परिसराला सुरक्षित ठेवूया’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.