May 17, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर–बालेवाडी परिसरातील वीज समस्येविरोधात नागरिकांचे जनआंदोलन

बाणेर दि. १६ मे २०२६ :

बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि महाळुंगे परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेजमधील तीव्र चढउतार, डीपी ब्लास्ट आणि अनेक तास चालणाऱ्या वीज समस्यांविरोधात नागरिकांनी शनिवारी सायंकाळी सिग्नेट कॉर्नर, बालेवाडी फाटा येथे एकत्र येत तीव्र जनआंदोलन केले.

BBPRA आणि BBNM यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने रहिवाशांनी सहभाग घेतला. “पूर्ण बिल भरतो — मग पूर्ण वीज का नाही?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

नागरिकांनी सांगितले की, एप्रिल २०२६ पासून परिसरात जवळपास दररोज वीजपुरवठा खंडित होत असून आठवड्यातून अनेक वेळा २ ते ४ तास वीज गायब राहत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, घरून काम करणारे नागरिक तसेच लहान व्यवसायिक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरांतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही नुकसान झाले आहे.

आंदोलनादरम्यान महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी आरोप केला की, वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली.

नागरिकांच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

• विश्वासार्ह व अखंड वीजपुरवठा
• वारंवार होणाऱ्या वीज समस्यांबाबत जबाबदारी निश्चित करणे
• नुकसान झालेल्या उपकरणांची भरपाई देणे
• बाणेर–बालेवाडी परिसरातील वीज पायाभूत सुविधा तातडीने मजबूत करणे
• अतिरिक्त लोड व्यवस्थापन आणि बॅकफीडिंग व्यवस्था सक्षम करणे

नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या आंदोलनाला परिसरातील विविध सोसायट्या, नागरिक संघटना आणि रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.