बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी माननीय प्रमुख पाहुणे श्री. संजीव कुलकर्णी – अध्यक्ष (भारत विकास परिषद कोथरूड शाखा पुणे), श्री. प्रदीप ओक – माजी अध्यक्ष आणि माजी प्रांत महासचिव (भारत विकास परिषद कोथरूड शाखा पुणे), श्री. उदय हर्डीकर – माजी अध्यक्ष (भारत विकास परिषद कोथरूड शाखा पुणे) तसेच संचालिका मा. कु. शिवानी राजेंद्र बांदल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वातावरणात देशभक्ती आणि शिवप्रेमाची भावना दाटून आली होती.
विद्यार्थ्यांनी “झुलवा पाळणा” हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य आणि स्वराज्यावरील अपार प्रेम प्रभावीपणे उभे राहिले.
कु. सृष्टी माने हिने शिवाजी महाराजांवर प्रभावी भाषण केले. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेले पराक्रम, दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचार यांवर तिने प्रकाश टाकला.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेला लेझीम हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. लेझीम हा पारंपरिक मराठी व्यायामप्रकार असून तो शौर्य, एकजूट, शिस्त आणि ताकद यांचे प्रतीक मानला जातो. शिवरायांच्या मावळ्यांमध्येही अशीच ताकद, संघटनशक्ती आणि देशभक्ती होती. लेझीमच्या तालबद्ध सादरीकरणातून मावळ्यांची तीच जिद्द आणि उत्साह प्रकट झाला.
कार्यक्रमात संचालिका मा. कु. शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी होऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे भविष्य असून विविध क्षेत्रांत ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि स्वाभिमान या मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असेही त्यांनी सांगितले.
माननीय पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळ्या वातावरणात संवाद साधला. त्यांनी या दिवसाचे महत्त्व समजावून सांगत शिवाजी महाराजांच्या कार्यातून आपण काय शिकले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या संवादाचा मनापासून आनंद घेतला.
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अक्षदा बोत्रे आणि श्री. रामकिसन जोगदंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सूरज साठे, श्री. विशाल तकमोगे, श्री. अक्षय कबाडे, सौ. वृशाली ब्रह्मे व सौ. प्राजक्ता पिल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.
शौर्य, प्रेरणा आणि स्वराज्याच्या विचारांनी भारलेला हा जयंती सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. 🚩



More Stories
सूस शाखेच्या पेरीविंकल मध्ये शिवनेरी ते रायगड : विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवकाल …….
पेरीविंकल पौड शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी.
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन