बाणेर :
बाणेर बालेवाडी परिसरात शेकडो नागरिक आज एकत्र येत बाणेर पोलीस ठाण्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा मूक मोर्चा काढून दुर्गाला न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली. दुर्गा हिचा २७ तारखेला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेबाबत संशय व्यक्त होत असतानाही संबंधित संशयितांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
मोर्चादरम्यान नागरिकांनी शांततेत आपली भावना व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, मोर्चात सहभागी झालेल्यांनी असा दावाही केला की, याच संशयिताचा दुर्गाच्या बहिणीशी संबंधित पूर्वीच्या एका गंभीर घटनेतही सहभाग होता. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या मूक मोर्चाचे आयोजन बाणेरमधील विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तरित्या केले होते. यामध्ये Baner Balewadi Pashan Resident Association (BBPRA), Baner Balewadi Nagarik Manch (BBNM), WAMA Women’s Club, स्त्री Foundation, Balewadi Women’s Club, Jio Foundation, Baner Balewadi व्यापारी संघटना तसेच इतर ११ सामाजिक संस्थांचा सहभाग होता. बाणेर पोलीस स्टेशन वर पहिल्यांदाच असा मोर्चा निघाला आहे.
मोर्चाच्या शेवटी प्रतिनिधीमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची भेट घेत दुर्गा प्रकरणी न्याय मिळावा यासाठी निवेदन सादर केले. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
या घटनेमुळे बाणेर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिक न्यायासाठी एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.




More Stories
“विद्युत विभागाची धडक कारवाई: बाणेर परिसरात २८०० मीटर अनधिकृत केबलवर कारवाई”
जागतिक कॅरम विजेती रश्मी कुमारी यांच्या हस्ते ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ अंतर्गत पीएनजी पुरवठ्याचा औंधमध्ये शुभारंभ
ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ