February 9, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

युरोजेनिटल कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखणे गरजेचे – डॉ. संजय कुलकर्णी यांचे मत; जागतिक कर्करोग दिनानिमित्त बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटलमध्ये संवाद

जनजागृती, वेळेवर निदान व योग्य उपचाराने कर्करोगावर मात शक्य: डॉ. संजय कुलकर्णी

बाणेर :

मूत्रमार्गाशी संबंधित प्रोस्टेट, मूत्रपिंड, मूत्राशय व अंडकोषाचा कर्करोग यांसारख्या युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून, ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे. मात्र, योग्यवेळी निदान झाले, तर आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीने या कर्करोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यासाठी व्यापक जनजागृती, नियमित आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट व युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.

जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, रोबोटिक सर्जन डॉ. अमित होसरमनी, युरोऑन्को सर्जन डॉ. रोहित देशपांडे व डॉ. उदय चंदनखेडे, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, युरोकुलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भावे आदी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, “प्रोस्टेट कर्करोगामध्ये लघवी करताना अडथळा, वारंवार लघवी, तर मूत्राशयाच्या कर्करोगात लघवीत रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे असतात. मात्र, अनेकदा सुरुवातीला ही लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत. त्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर नियमित तपासण्या कराव्यात. जीवनशैलीतील बदल, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव हे कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे दुखणे अंगावर काढण्याची मानसिकता टाळून वेळेवर डॉक्टरांकडे जावे. उशीर झाल्यास उपचार गुंतागुंतीचे होतात.”

डॉ. अमित होसरमनी यांनी रोबोटिक सर्जरी, डॉ. रोहित देशपांडे यांनी किडनी व अन्य कर्करोग, तर डॉ. उदय चंदनखेडे यांनी कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी सांगितले. २०४५ पर्यंत जगभरात कर्करोगग्रस्तांचे प्रमाण तीन कोटी २६ लाखांवर जाईल, तर कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास पावणेदोन कोटींपर्यंत असेल, असा धोकादायक अंदाजही त्यांनी वर्तविला.

युरोलॉजी व किडनी संदर्भातील आजारांवरील उपचारांकरिता महाराष्ट्र राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना युरोकूल हॉस्पिटलमध्ये लागू झाली असून, गरजू व पात्र रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजेश देशपांडे यांनी केले.

कर्करोगाविषयी असलेल्या गैरसमजांना दूर करून समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. कर्करोग म्हणजे शेवट नाही; योग्य उपचार, सकारात्मक मानसिकता आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो,” असा आशावादी संदेश डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी दिला.
———————-
डॉ. कुलकर्णी यांचा इंदोर येथे गौरव
युरोलॉजीमधील उल्लेखनीय व भरीव योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट व युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. संजय कुलकर्णी यांचा इंदोर (मध्यप्रदेश) येथे गौरव करण्यात आला. दी युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या ५९ व्या वार्षिक अधिवेशनात प्रा. महेंद्र भंडारी युएसआय मेडल’ पुरस्काराने सन्मान झाला, ही युरोकूल आणि पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ६००० युरोलॉजिस्टची संस्था असलेल्या युरोलॉजी सोसायटीकडून मिळालेला हा सन्मान आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा देणारा आहे, अशी भावना डॉ. संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.