पुणे :
बाणेर येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. १९८८ मध्ये जमीन विक्रीतून मिळालेल्या ७१ लाख २४ हजार १३९ रुपयांचे सध्याचे मूल्य पाच कोटी रुपये झाल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. मात्र, या रकमेचा मुदतठेवीशी संबंध असल्याचे पुरावे सादर झालेले नाहीत. तसेच युको बँकेतील १६ लाखांच्या ठेवींबाबतही स्पष्टता नसल्याचे धर्मादाय आयुक्तालयाच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे.
ट्रस्टचे विश्वस्त दिलीप बबन मुरकुटे यांनी याप्रकरणी १६ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. सहायक धर्मादाय आयुक्त-२ यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार निरीक्षकांनी चौकशी करून १७ ऑगस्ट २०२५ रोजी अहवाल सादर केला. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाणेर शाखेतील चार आणि कॅनरा बँकेच्या औंध शाखेतील चार अशा आठ मुदतठेवींची एकूण मॅच्युरिटी रक्कम पाच कोटी ११ लाख ९२ हजार ७९९ रुपये आहे. मात्र, या ठेवी जमीनविक्रीच्या रकमेतूनच केल्याचे पुरावे नसल्याने खुलासा मागविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच, यु.को बँकेतील १६ लाखांच्या ठेवीची पावती बँकेच्या संगणकीकरणादरम्यान फाटल्याने गहाळ झाल्याने उपलब्ध नसल्याचे विश्वस्तांनी सांगितले. २००४ मध्ये तसेच लाखोंची ठेव केल्याची त्यांनी नमूद केले. मात्र, या दोन्ही ठेवींचा संबंध स्पष्ट झालेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
खंडोबा मंदिराच्या मालकीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. ट्रस्टच्या खात्यातून रोख रक्कम काढून अपहार केल्याचा आरोप विश्वस्तांनी फेटाळला. कुस्ती स्पर्धेतील बक्षिसे व किरकोळ खर्च रोखीने होत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा खर्च धनादेश अथवा आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएसद्वारे करण्याच्या सूचना देण्याची शिफारस निरीक्षकांनी अहवालात केली आहे.
मंदिराच्या बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडे १८ लाख रुपये भरण्याचे काम सुरू नसल्याचा आरोप करण्यात आला. आराखड्याच्या मंजुरीसाठी ही रक्कम मुरकुटे यांनी सचिव असताना भरल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, कामाचे छायाचित्र, पुरावे आणि जमाखर्चाची कागदपत्रे सादर झालेली नाहीत.



More Stories
दिवाळी फराळाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत; योगीराज पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम, तसेच कर्मचाऱ्यांना २९ लाखांचे दिवाळी बोनस व लाभ! संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांची घोषणा..
बालेवाडी स्टेडियमसमोरील कचरा डेपो अखेर बंद!मोरेश्वर बालवडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश..
बनावट स्टॅम्प आणि खोट्या नोटरीद्वारे बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल