August 27, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*राखीच्या धाग्यातून जपली माणुसकी; बावधनच्या पेरीविंकल विद्यार्थ्यांनी सावलीतील बालकांसोबत साजरे केले रक्षाबंधन!*

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन शाखेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत आगळ्या पद्धतीने साजरा केला. कोथरूड येथील ‘सावली’ संस्थेतील अनाथ, विशेष व दिव्यांग बालकांची भेट घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे क्षण अनुभवत रक्षाबंधन साजरे केले.

 

रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव नसून प्रेम, जिव्हाळा, संरक्षण आणि माणुसकीच्या भावनेचा सुंदर आविष्कार आहे. याच भावनेतून पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू आणि विशेष बालकांशी आपलेपणाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शाळेच्या वतीने ‘एक मूठ धान्य’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. गरजू बालकांसाठी प्रत्येकाने आपल्या परीने छोटीशी मदत करावी, या भावनेतून विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने विविध प्रकारचे धान्य शेंगदाणे , पोहे, चणा डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, कांदे, बटाटे, मूग, मटकी, रवा, असे बरेच खाद्यपदार्थ प्रत्येकी 15 ते 20 किलो आणि जीवनावश्यक वस्तू टूथपेस्ट, साबण, हॅण्डवॉश, तेल आदी शिक्षकांसमवेत सर्वांनी
संकलित केल्या. पालकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या परीने साहित्य दिले. ‘एक मूठ धान्य… माणुसकीसाठी एक मोठे पाऊल!’ या भावनेतून केलेले हे संकलन सावली संस्थेतील बालकांसाठी सुपूर्द करण्यात आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेत त्यांच्यासोबत वेळ घालवला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी बालकांना प्रेमाने राख्या बांधून शुभेच्छा दिल्या. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि विद्यार्थ्यांच्या मनातील समाधान हा या भेटीचा सर्वात भावनिक क्षण ठरला.

विद्यार्थ्यांनी बालकांसाठी विविध धान्य, खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि इतर जीवनावश्यक साहित्य संस्थेकडे सुपूर्द केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सामूहिक सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण झाला.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बालकांसोबत विविध मनोरंजक उपक्रम, गाणी आणि नृत्य सादर करून आनंदाचे वातावरण निर्माण केले. विशेष बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. परस्परांच्या कलागुणांना दाद देत सर्वांनी आनंदाचे क्षण एकत्र अनुभवले. ‘आपण सारे एकमेकांचे आहोत’ हा भाव या संपूर्ण उपक्रमातून प्रकर्षाने जाणवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील शिक्षणाचा अनुभव मिळाला. सहानुभूती, सहकार्य, दानशीलता, सेवाभाव, कृतज्ञता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली. गरजू बालकांसोबत काही क्षण आनंदाने घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी शाळेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबत संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे ही शाळेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आदर, संवेदनशीलता आणि मदतीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, व्यवस्थापकीय संचालिका सौ. शिवानी बांदल तसेच प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षिका सायली गायकवाड आणि शिरीन काझी यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी तसेच हाउस इन्चार्ज कांचन मोरे व आदिती कुलकर्णी यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

“रक्षाबंधनाचा खरा अर्थ केवळ राखी बांधण्यात नाही, तर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा धागा प्रत्येक हृदयाशी जोडण्यात आहे,” हा संदेश बावधनच्या पेरीविंकल विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला. ‘एक मूठ धान्य’पासून एका प्रेमळ राखीपर्यंत—माणुसकी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरला.