सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस येथील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांनी उरावडे येथील अनिकेत सेवाभावी संस्था या अनाथ व मतीमंद मुलांच्या आश्रमाला भेट देऊन तेथील बालकांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थांचे वाटप केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ मदतीचा हात पुढे केला नाही, तर प्रेम, आपुलकी, माणुसकी आणि बंधुभावाचा संदेशही दिला.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक असलेला सण आहे. या सणामागील प्रेम व आपुलकीची भावना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने पेरीविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. शाळेने पालकांना गरजू बालकांसाठी आवश्यक वस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू उपलब्ध करून दिल्या.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सामूहिक सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित करण्यात आले. यामध्ये चणे, शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे, बिस्किटे, रवा, मैदा, खाद्यतेल, मटकी, तूर डाळ, मूग डाळ, चणाडाळ, पोहे , तेल , तांदूळ,साबुदाणा तसेच इतर विविध दैनंदिन वापराच्या टूथपेस्ट, साबण, हॅण्डवॉश जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. संकलित करण्यात आलेल्या या वस्तू अनाथाश्रमातील बालकांना देण्यात आल्या.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अनाथाश्रमातील बालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून पेरीविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनाथाश्रमातील मुलांना प्रेमाने राखी बांधली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव यामुळे वातावरण भावनिक आणि आनंददायी झाले.
यावेळी अनाथाश्रमातील विशेष मुलांनी पेरीविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्साहाने सुंदर नृत्य सादर केले. त्यांच्या निरागस आणि आत्मीय सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कलागुणांना दाद देत पेरीविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासाठी विविध नृत्ये आणि गाणी सादर केली. या सादरीकरणामागे केवळ मनोरंजनाचा उद्देश नसून, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, त्यांचा दिवस आनंदात जावा आणि त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी, हीच विद्यार्थ्यांची मनापासूनची भावना होती. परस्परांच्या कलागुणांना दाद देत आणि आनंदाचे क्षण एकत्र अनुभवत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि माणुसकीचा सुंदर संदेश दिला.
राखी बांधताना विद्यार्थ्यांनी रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपण्याचा आणि प्रत्येकाला आपले मानण्याचा संदेश दिला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना गरजू व्यक्तींच्या जीवनातील अडचणी समजून घेण्याची आणि त्यांच्याप्रती संवेदनशील राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहानुभूती, सहकार्याची भावना आणि सेवाभाव अधिक दृढ झाला.
शाळेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यामध्ये मूल्यशिक्षण, सामाजिक जबाबदारी, संवेदनशीलता, दानशीलता आणि सेवाभाव निर्माण व्हावा, हा या उपक्रमांमागील प्रमुख उद्देश आहे असे सांगत शिक्षणासोबतच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यांनी जबाबदार नागरिक म्हणून घडावे, यासाठी शाळेकडून सातत्याने अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते असे प्रतिपादन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ‘देण्यातला आनंद’ अनुभवता आला. गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली. पालकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सामाजिक कार्यासाठी शाळेला सहकार्य केले.
या प्रसंगी पेरीविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, ज्ञानेश्वर मोरे, नम्रता वर्मा अनुराधा यादव आदी शिक्षकवृंद आणि या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, माणुसकी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल व शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या उपक्रमातून “सण केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी नसून, तो इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याची संधी आहे” हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेला मिळालेली ही सकारात्मक दिशा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.





























More Stories
पेरिविंकलमध्ये रोबोटिक्सचा मेळावा; विद्यार्थ्यांच्या कल्पनांना तंत्रज्ञानाचे पंख
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार