बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल व मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ चा विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन पोलीस स्टेशन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ‘आजच्या दिवसाचे महत्त्व’ या विषयावर मनोगत व्यक्त करताना यावर्षी विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक EVM App च्या माध्यमातून घेण्यात आल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थी मंत्रिमंडळाने शिस्तबद्ध व आकर्षक मार्च पास्ट सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते हेड बॉय, हेड गर्ल, स्कूल कॅप्टन, व्हाईस कॅप्टन तसेच चारही हाऊसचे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन यांना बॅज, सॅश व ध्वज प्रदान करून जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना शपथ देण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे मा. श्री. अरविंद पवार यांच्या कार्याचा गौरव करताना, समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. “समाज घडवायचा असेल तर मा. श्री. अरविंद पवार यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. ते खऱ्या अर्थाने समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रमुख पाहुणे मा. श्री. अरविंद पवार यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “स्वतःला घडवायचं काम स्वतःचं आहे. संस्कार दुसरा कोणी देत नाही; ते स्वतःमध्ये निर्माण करावे लागतात,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित दिनचर्या ठेवावी, कृतज्ञतेची भावना जोपासावी, दररोज व्यायाम करावा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि ज्येष्ठांचा आदर करावा, असा संदेश दिला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व सांगत त्यासाठी लवकर तयारी करण्याचे आवाहन केले. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, सायबर फसवणूक याबाबतही विद्यार्थ्यांना सावध केले. “शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही व्यायाम आवश्यक आहे. अवांतर वाचनाची सवय लावा, चांगले छंद जोपासा आणि जीवनाचे ध्येय निश्चित करा,” असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला. आपल्या मनोगतात त्यांनी अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांच्या शैक्षणिक कार्याचाही विशेष गौरव केला. केवळ ४० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेने आज सात शाखांमधून पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत केलेला प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, आपल्या पोलीस सेवेत अनेक युवकांना व्यसनमुक्त करून त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळविणे, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणे तसेच समाजातील विविध घटकांना मदत करून त्यांना नवजीवन देण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांना विविध स्तरांवर गौरविण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी आभारप्रदर्शनाने व वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली स्पोर्ट्स टीचर सुरज साठे व विशाल ताकमोघे यांच्या समवेत पर्यवेक्षक सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या मदतीने करण्यात आले होते.



More Stories
*सूस शाखेतील पेरिविंकल शाळेच्या पूर्व-प्राथमिक विभागात ‘ग्रीन डे’ चा आगळा वेगळा व्हेजिटेबल मार्केट उपक्रम उत्साहात साजरा!!!*
*बावधन शाखेच्या पेरीविंकल स्कूल मध्ये वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर – श्री दीपक गोसावी यांच्या हस्ते वाहतूक नियम, सायबर गुन्हे आणि व्यसनमुक्तीबाबत विद्यार्थ्यांना बोधपर मार्गदर्शन* !!!!
संत तुकाराम पालखी सोहळ्यानिमित्त बाणेर-बालेवाडी-औंध-पाषाण व्यापाऱ्यांकडून साडेतीन हजार उपवासाचे पदार्थांच्या पाकिटांचे वाटप..