July 14, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुढच्या पिढीचा विचार करा आणि आजच पाणी वाचवायला सुरवात करा” : जल संधारण तज्ञ सतीश खाडे बालेवाडी वेल्फेअर चा स्तुत्य उपक्रम 

बालेवाडी :

बालेवाडी वेलफेअर फेडरेशन तर्फे आयोजित “जल पुनर्भरण आणि जल संधारण” या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. याप्रसंगी प्रसिद्ध जल सांधरण तज्ञ सतीश खाडे यांनी उपस्थितांना हा विचार दिला. पुणेकर नागरिकांच्या पाण्याच्या गरजेपैकी ६५ टक्के गरज धरणातील पाणी आणि ३५ टक्के भूजल साठयातून भागविली जाते. मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि वाढती लोकसंख्या यामुळे झपाट्याने भूजल साठा कमी होत असून आपण जल पुनर्भरण [रेन वॉटर हारवेस्टिंग] कार्यक्रम हाती घेतला नाहीतर लवकरच मोठे जल संकट निर्माण होऊ शकते. आजच अनेक सोसायटीत टँकरचे पाणी विकत घेतले जाते. पुढे पाणी पैसे खर्च करूनही मिळेल का याची हमी देता येत नाही. अनेक गृहनिर्माण सोसायटीत केवळ कायदेशीर पूर्तता म्हणून रेन वॉटर हारवेस्टिंग प्रकल्प केले जातात. परंतु ते चालू आहेत का, त्याची देखभाल होते का याबद्दल नागरिक उदासीन असतात. प्रशासन, लोकप्रतिनिधि आणि नागरिक या सर्वांनी जल संकट, आणि हवामान बदलांचे होणारे प्रतिकूल परिणाम हे विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

सतीश खाडे यांनी जल संकट, जल प्रदूषण याबद्दल विशेष माहिती देऊन छोटे छोटे उपाय करून पाणी कसे वाचवावे, पाणी कसे शुद्ध करावे याची प्रात्यक्षिके व उदाहरणे दिली. नळाला एरेटर, फ्लो रेग्युलेटर बसविले तर पाण्याची बचत होते. श्रीकांत साबू, स्नेहल गुप्ता, प्रल्हाद पांडे यांनी उत्सुकता दाखवून उपाय समजाऊन घेतले. पाण्याची बचत आणि जलसंधारण विषयी नागरिकांमध्ये जागृती आणि जबाबदारी निर्माण करणे गरजेचे आहे व हे काम बालेवाडी वेलफेअर फेडरेशन सारख्या नागरिकांच्या संघटनांनी हाती घ्यावे असे आवाहन सतीश खाडे यांनी केले.

फेडरेशन तर्फे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी सांगितले हे जनजागृतीचे काम आम्ही निक्षितपणे पुढे नेऊ. कार्यक्रम संपल्यावर आदित्य ब्रिज सोयटीतील रेन वॉटर हारवेस्टिंग सिस्टम नागरिकांना प्रत्यक्ष दाखविली व लोकांच्या प्रश्नाची उत्तरे कॉँट्रॅक्टर रमेश गायके यांनी दिली. उपस्थितांनी फेडरेशनच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

सतीश खाडे यांचे जल साक्षरता आणि पर्यावरण बचावचे कार्य मोठे आहे. गेली तेरा वर्ष ते हे जागृतीचे काम करीत आहेत. अभिनव जलनायक या पुस्तकाचे ते लेखक असून त्यांच्या कार्याबद्दल अनेक संस्था आणि लोकांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

बालेवाडी वेलफेअर फेडरेशन तर्फे दफेदार सिंह, आशिष कोटमकर, शकील सलाती, वंदना चौधरी, शैलेश पाटील यांनी सतीश खाडे यांचा सत्कार केला. आदित्य ब्रीजचे सेक्रेटरी मंगलमूर्ती यांनी सर्वांचे स्वागत केले तर योगेश डुंबरे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले. मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, शुभांगी इंगवले, योगेंद्र सिंह व यश चौधरी यांनी देखील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.