July 17, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*बावधन शाखेच्या पेरीविंकल स्कूल मध्ये वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर – श्री दीपक गोसावी यांच्या हस्ते वाहतूक नियम, सायबर गुन्हे आणि व्यसनमुक्तीबाबत विद्यार्थ्यांना बोधपर मार्गदर्शन* !!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक जागरूकता, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती या विषयांवर विशेष जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करणे तसेच व्यसन आणि अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा संदेश देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी बावधन वाहतूक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (PI) श्री. दीपक गोसावी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका सौ. शिवानी बांदल, प्राचार्या सौ. निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व नियमावली, रस्ते सुरक्षा आणि शिस्त याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट बांधणे, सिग्नलचे पालन, वेगमर्यादा पाळणे, रस्त्यावर जबाबदारीने वागणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा आदर करणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडच नव्हे, तर गंभीर अपघात आणि जीवितहानी होऊ शकते, याची जाणीव करून देण्यात आली.

आजच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, OTP व पासवर्डची चोरी, फेक अकाउंट, सायबर बुलिंग, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला. विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधताना काळजी घ्यावी, आपली वैयक्तिक माहिती, फोटो, पासवर्ड किंवा OTP कोणाशीही शेअर करू नये आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाच्या वापराबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली. “Facebook आणि Instagram खरंच गरजेचे आहे का?” या प्रश्नातून सोशल मीडियाचा अतिरेक टाळण्याचा संदेश देण्यात आला. सोशल मीडिया ज्ञान आणि संवादासाठी उपयुक्त असला, तरी त्याचा अतिरेक अभ्यास, एकाग्रता, झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

तसेच व्यसन आणि अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबतही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच अमली पदार्थांचे सेवन सुरुवातीला मित्रांच्या आग्रहामुळे किंवा कुतूहलातून सुरू होऊ शकते; मात्र पुढे त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होऊ शकते.* व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्त्व, कुटुंब आणि भविष्यातील संधींवर होणारे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. *चुकीची संगत आणि मित्रांचा दबाव यांना बळी न पडता आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले.

*सायबर गुन्हे, अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, धमकी, छळ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी झाल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.* कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास ती लपवू नये, तर पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना “सुरक्षित रस्ता, सुरक्षित इंटरनेट आणि व्यसनमुक्त जीवन”* यांचे महत्त्व समजावून देण्यात आले. *वाहतूक नियमांचे पालन करून, डिजिटल जगात जबाबदारीने वावरून आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी देशाचे जबाबदार नागरिक बनावे, असा संदेश देण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली, अचूक नियोजनाने तसेच पर्यवेक्षिका सौ. सायली गायकवाड आणि सौ. शिरीन काझी यांच्या नेतृत्वाखाली, सर्व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. वंदे मातरम् ने मार्गदर्शन सत्राची सांगता करण्यात आली.

 

You may have missed