November 27, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*भारतीय हवाई दलाच्या शौर्याचा अद्भुत अनुभव! चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकलच्या ५०० विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपणाद्वारे हवाई शक्तीच्या थरारक प्रात्यक्षिकांचे दर्शन!*

पुणे :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन, सूस, पिरंगुट आणि पौड या सर्व शाखांतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाच्या शौर्य, सामर्थ्य आणि अद्वितीय कौशल्याचा थरार अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. ‘डॉ. कलाम ग्राम शिक्षण नेता’ या उपक्रमांतर्गत शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष शैक्षणिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाच्या लोहेगाव एअर फोर्स स्टेशनवरील भव्य हवाई प्रात्यक्षिकांचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा लाभ मिळाला. आकाशात झेपावणाऱ्या लढाऊ विमानांच्या थरारक कसरती, हेलिकॉप्टरचे नेत्रदीपक सादरीकरण आणि भारतीय हवाई दलाच्या अद्भुत सामर्थ्याचे दर्शन विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरले.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या लढाऊ विमानांनी आकाशात साकारलेल्या चित्तथरारक कसरती, सारंग हेलिकॉप्टर टीमचे नेत्रदीपक सादरीकरण, अत्याधुनिक Su-30 MKI फायटर जेटचे लो-लेव्हल एरोबॅटिक्स आणि फ्लायपास्ट यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. चेतक हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक, ‘आकाश गंगा’ पथकाचे पॅराशूटद्वारे स्कायडायव्हिंग, रेडिओ नियंत्रित विमानांचे एरोमॉडेलिंग शो तसेच लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सचे प्रदर्शन अशा विविध सादरीकरणांचा थेट प्रक्षेपणाद्वारे अनुभव घेता आला.

केवळ पुस्तकांमध्ये आणि चित्रफितींमध्ये पाहिलेली अत्याधुनिक लढाऊ विमाने, त्यांची कार्यक्षमता आणि हवाई दलाचे कौशल्य यांचे प्रत्यक्ष हवाई प्रात्यक्षिकांचे थेट दर्शन विद्यार्थ्यांसाठी विलक्षण अनुभव ठरले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, एरोनॉटिक्स आणि संरक्षण क्षेत्रातील विविध संधींची ओळख झाली. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या भारतीय हवाई दलातील जवानांची शिस्त, समर्पण, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा यांची प्रेरणादायी जाणीव झाली.

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि देशभक्तीची भावना विकसित व्हावी, या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनातून पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
संस्थेच्या संचालिका शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना मोठी स्वप्ने पाहा, मेहनतीची तयारी ठेवा आणि अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने पुढे चला, असा मोलाचा संदेश दिला. जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल ,संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल व सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाने सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थी यांच्या पुढाकारातून बावधन, सूस, पिरंगुट आणि पौड या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना हा ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव उपलब्ध करून देण्यात आला.

‘आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने पाहा, जिद्दीने भरारी घ्या आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्या!’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय हवाई दलाविषयी अभिमान, आदर आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा ठरला. ५०० विद्यार्थ्यांसाठी हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर ज्ञान, विज्ञान, साहस आणि राष्ट्रप्रेम यांचा सुंदर संगम असलेला आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव ठरला!

 

You may have missed