खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दोन मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली
बालेवाडी :
पुणे मेट्रोच्या लाईन-३ वरील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके आज पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. यानिमित्त मोहोळ यांनी बालेवाडी हाय स्ट्रीट ते औंध मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोमधील प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम पाठबळाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणाला आणि विस्ताराला गती मिळत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. या मार्गिकेवरील एकूण २३ स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात १६ स्थानके प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आली होती. आज बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही आणखी दोन स्थानके सुरू झाल्याने कार्यान्वित स्थानकांची संख्या १८ झाली आहे.
येत्या दोन महिन्यांत आणखी चार मेट्रो स्थानके सुरू होणार असून, त्यानंतर संपूर्ण मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. सध्या या मार्गिकेवर दररोज सरासरी ५० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, नव्या स्थानकांमुळे प्रवासी संख्येत आणखी वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मेट्रोच्या विस्तारणाऱ्या जाळ्यामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासही मेट्रो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक, सक्षम आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पुणे मेट्रो ३ चे मुख्याधिकारी अनिल सैनी, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका मयुरीताई कोकाटे, नगरसेविका रोहिणी चिमटे, सचिन पाषाणकर, राहुलदादा बालवडकर, अमर लोंढे, जीवन चाकणकर, रोहन कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे यांच्यासह मेट्रोच्या विविध विभागांचे अधिकारी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



More Stories
*रोबोटिक्सच्या अद्भुत विश्वाने पेरिविंकलच्या सूस शाखेचा ओपन डे ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू!**विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड; ५० हून अधिक रोबोटिक्स प्रकल्पांच्या प्रदर्शनाने पालक मंत्रमुग्ध!*
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील गोवंश संवर्धनाचा संकल्प, राहुलदादा बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भूम-पाथरूड परिसरातील गोवंशासाठी चारा पाठविण्याचा स्तुत्य उपक्रम
*जिद्द, जिंकण्याची उमेद आणि खिलाडूवृत्तीचा जल्लोष! पेरिविंकल बावधनच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन!*