November 27, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी-वाकड जोडरस्ता, म्हाळुंगे टी.पी. स्कीमला गती द्या; नगरसेवक अमोल बालवडकरांचा आयुक्तांकडे आग्रही पाठपुरावा

पुणे :

पुणे शहरातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावून त्यांना गती मिळावी, या उद्देशाने नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीम या महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष वेधत संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी बालवडकर यांनी आयुक्तांकडे केली. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यास बालेवाडी, म्हाळुंगे आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील अडथळे दूर करून कामाला गती देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

त्याचप्रमाणे म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडथळे दूर करून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या विकास योजनेमुळे परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार असून, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या भेटीदरम्यान पुणे शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रभावी कार्यवाही करावी, यावर भर देण्यात आला.

“पुण्याचा विकास केवळ घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांना दिलासा देणारी विकासकामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित कामे प्रत्यक्षात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,” असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

 

You may have missed