November 11, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान; मुळशी तालुक्यात स्नेह आणि आपुलकीचा अनोखा उपक्रम*

मुळशी :

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे आणि आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला फराळ व स्नेहमिलनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

*चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांच्या पुढाकाराने या स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यनगरीचे पत्रकार तसेच ग्रामीण पत्रकार महासंघाचे अध्यक्ष पप्पू शेठ कंधारे, दैनिक सकाळचे पत्रकार बंडू दातीर,पत्रकार अनिल वढगुले, दीपक सोनवणे, प्रवीण सातव, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मारणे, रमेश उभे, अर्जुन पसाले, केतन सुर्वे, सागर शितोळे यांच्यासह मुळशी तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते*.

समाजातील प्रश्न, सामान्य नागरिकांच्या अडचणी, विकासकामे, शासकीय योजना आणि लोकहिताच्या विषयांना आपल्या लेखणीतून सातत्याने व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार बांधव करीत असतात. समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते.

*याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला. दिवाळी फराळाचा आनंद घेत असतानाच उपस्थित पत्रकार बांधवांना छोटीशी भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व कौतुक करण्यात आले.*

यावेळी बोलताना राजेंद्र बांदल यांनी, पत्रकारिता ही केवळ बातम्या प्रसिद्ध करण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारी आणि लोकशाही अधिक सक्षम करणारी प्रभावी शक्ती आहे. निर्भीड, निःपक्षपाती आणि विधायक पत्रकारितेमुळे समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळतो. पत्रकार बांधवांचे योगदान हे समाजाच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना समाजातील प्रत्येक घटकासोबत स्नेहाचे, विश्वासाचे आणि सहकार्याचे नाते जपणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमिलनामुळे पत्रकार बांधवांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ झाले.

पत्रकार बांधवांची लेखणी सदैव निर्भीड राहो, त्यांच्या लेखणीतून समाजहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जावोत आणि मुळशी तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीत त्यांचे योगदान असेच महत्त्वपूर्ण राहो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

*पत्रकारितेचा सन्मान म्हणजे लोकशाही मूल्यांचा सन्मान! समाजहितासाठी झटणाऱ्या पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.*

 

You may have missed