June 26, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या व्यवस्थापकीय संचालिका कु. शिवानी बांदल व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न!!*

*कृत्रिम बुद्धिमत्ता हेच उद्याचे भविष्य; कौशल्याधारित शिक्षणातून सक्षम भारत घडेल” – कु. शिवानी बांदल*
*”शिस्त, सातत्य आणि परिश्रम यांच्या जोरावरच विद्यार्थी यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतात” – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख*

*५० हून अधिक नामांकित शाळांचा सहभाग; रोख पारितोषिके, पदके, प्रशस्तीपत्रांचे वितरण तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांचा विशेष सन्मान!!!*

पुणे :

ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था (JIERT), पुणे यांच्या वतीने आयोजित आर्यभट्ट मेन्स स्कॉलरशिप परीक्षा २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नितू मांडके सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या व्यवस्थापकीय संचालिका कु. शिवानी बांदल आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यांच्यासमवेत पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संचालक श्री. यशराज बांदल, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भावना जोशी, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. किशोर बोरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पुणे व परिसरातील ५० हून अधिक नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर सौ. सारिका शेंडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षेचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याचे महत्त्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्थेचे योगदान स्पष्ट केले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम या चार मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणतेही यश अशक्य नाही. स्पर्धा परीक्षा या केवळ गुण मिळविण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी व्यासपीठ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अशा परीक्षांमध्ये सहभागी होऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी.”

डॉ. भावना जोशी यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील समन्वय हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशाचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. श्री. किशोर बोरसे यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार करून ज्ञानाबरोबरच कौशल्यांचा विकास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख अतिथी कु. शिवानी बांदल यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात सांगितले की, “आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज आहे. भविष्यातील प्रत्येक क्षेत्रात AI महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सर्जनशीलतेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ज्ञान, कौशल्य आणि नैतिक मूल्यांच्या आधारावरच सक्षम, आत्मनिर्भर आणि विकसित भारताची निर्मिती होईल.” त्यांच्या विचारांना उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यंदाच्या आर्यभट्ट मेन्स स्कॉलरशिप परीक्षेत पुणे व परिसरातील ५० हून अधिक नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये मुक्तांगण शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, नूमवी, रेणुका स्वरूप विद्यालय, ज्ञानप्रबोधिनी, विद्यानकुर, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, आदित्य स्कूल तसेच इतर अनेक प्रतिष्ठित शाळांचा समावेश होता.

परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या विविध शाळांतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

*या प्रसंगी पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी श्रेयस सागर काटुरे याने आर्यभट्ट मेन्स स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत रोख पारितोषिक, पदक आणि प्रशस्तीपत्र प्राप्त केले. कु. शिवानी बांदल व डॉ. अ. ल. देशमुख यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संचालक श्री. यशराज बांदल, मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित उपस्थित होते. आपल्या पाल्याचा सन्मान शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संचालक आणि मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत होत असल्याचा हा अत्यंत अभिमानाचा व भाग्याचा क्षण असल्याच्या भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केल्या.*

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि गुणवंतांचा गौरव यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौशल्याधारित शिक्षणाची गरज अधोरेखित करणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.